

कुडाळ : प्रतिनिधी
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत आंदुर्ले गावात महिलांच्या पुढाकारातून श्रमदानाने वनराई बंधारा उभारण्यात आला.
आंदुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. सुप्रिया येरम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये गुरुकृपा महिला स्वयं सहाय्यता समूह, श्री देव ब्राह्मण महिला स्वयं सहाय्यता समूह, श्री समर्थ कृपा महिला स्वयं सहाय्यता समूहातील महिलांसह ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. एकूण २० महिलांनी श्रमदान करत हा वनराई बंधारा उभारला. आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी ‘पाणी अडवा – पाणी जिरवा’ ही वनराई बंधारे उभारणी मोहीम श्रमदानातून राबविण्यात येते. यावर्षी या मोहिमेअंतर्गत पक्के व कच्चे असे एकूण २० वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे. या वनराई बंधाऱ्यांमुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. महिलांच्या या सामाजिक व पर्यावरणपूरक योगदानाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.








