ठळक घडामोडी

चौकुळ येथे अवैध दारू वाहतूकीवर सावंतवाडी पोलीसांची कारवाई

अवैध दारूसह तब्बल १३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी : प्रतिनिधी

पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन अज्ञात संशयितांविरुद्ध मोठी कारवाई करत १३ लाख ४४ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात एक आलिशान क्रेटा कार (Hyundai Creta Car) आणि गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा समाविष्ट आहे. मात्र, कारवाईदरम्यान दोन्ही संशयित अंधाराचा फायदा घेऊन जंगलमय भागात पळून जाण्यात यशस्वी झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. ही घटना शनिवार दिनांक १३ रोजी रात्री सुमारे २०.४५ वाजता चौकुळ केगदवाडी येथील शिवमंदिरासमोर, चौकुळ ते कुंभवडे रोडवर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोन अज्ञात एमएच १० डीजी ७८८० या क्रमांकाच्या टायटन ग्रे रंगाच्या क्रेटा कारमधून गोवा बनावटीची दारू स्वतःच्या ताब्यात बाळगून तिची वाहतूक करत होते. पोलिसांनी संशयित क्रेटा कारला थांबण्याचा इशारा केला असता, आरोपींनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. उलट, त्यांनी भरधाव वेगात गाडी सुमारे १०० मीटर अंतर रिव्हर्स चालवली आणि रस्त्यावरच सोडून दिली. यानंतर दोघांनी तात्काळ गाडीतून उतरून अंधाराचा फायदा घेतला आणि जवळच्या जंगलमय भागात पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली. जप्त केलेल्या साठ्यामध्ये ‘इंपीरियल ब्लू व्हिस्की’ (गोवा बनावटीची) च्या १८० मिली मापाच्या प्रत्येकी ४८ बाटल्यांप्रमाणे एकूण ०७ पुठ्ठ्याचे बॉक्स (एकूण ३३६ बाटल्या) आणि ‘मॅकडॉवेल्स नं – १ ओरिजिनल ब्लेंडेड व्हिस्की’ (गोवा बनावटीची) च्या १८० मिली मापाच्या प्रत्येकी ४८ बाटल्यांप्रमाणे एकूण ०५ पुठ्ठ्याचे बॉक्स (एकूण २४० बाटल्या) समाविष्ट होते. या एकूण ५७६ बाटल्यांची अंदाजित किंमत एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये (₹१,४४,०००) इतकी आहे. दारू वाहतुकीसाठी वापरलेली क्रेटा कार (किंमत बारा लाख रुपये) देखील पोलिसांनी जप्त केली असून, त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत तेरा लाख चव्वेचाळीस हजार रुपये झाली आहे. या घटनेप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन संशयित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(अ)(ई), ८१, ८३, तसेच मोटर वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, १३४/ १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तातडीने रवाना करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, आणि एसडीपीओ सावंतवाडी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने (पोहवा/११५३ शिंदे, पोहवा/९९८ काळे, एचसी/१०२७ जाधवं, आणि पोलीस नाईक गौरव परब यांनी केली.

error: Content is protected !!