ठळक घडामोडी

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सावंतवाडी पोलीस ठाण्याचा गौरव!

सावंतवाडी : प्रतिनिधी

     एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील संशयित अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद करून सावंतवाडी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या तपासातील वेग आणि तत्परतेची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि त्यांच्या पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. 

    या घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. तपासादरम्यान एक आरोपी गोव्यात असल्याची माहिती मिळाली, तर दुसरा संशयित झारखंडला पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. झारखंडला पळून जाणाऱ्या संशयिताला जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले, तर दुसऱ्या संशयिताला गोवा येथून अटक करण्यात आली. दोन्ही संशयिताना २४ तासांच्या आत ताब्यात घेऊन पोलिसांनी कायदेशीर कारवाई पूर्ण केली. या गुन्ह्याच्या तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक तसेच संशयिताचा छडा लावून त्यांना ताब्यात घेणारे पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर, मंगेश शिंगाडे, गौरव परब आणि पोलीस कॉन्स्टेबल बर्गे यांचा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कारवाईमुळे सावंतवाडी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!