ठळक घडामोडी

शालान्त परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या आर्या राणेची ओझर विद्यामंदिरमध्ये प्रकट मुलाखत!

कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाची उत्साहात सांगता

मालवण : प्रतिनिधी
      ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ओझर विद्यामंदिरमध्ये फेब्रुवारी–मार्च २०२५च्या माध्यमिक शालान्त परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या आर्या राणे हिची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाची सांगता करण्यात आली.
         एस.एस.सी. बोर्डाने फेब्रुवारी–मार्च २०२६ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात सुरू केलेल्या कॉपीमुक्त अभियानांतर्गत १९ ते २६ जानेवारी या कालावधीत माध्यमिक शाळांमध्ये जनजागृती सप्ताह आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ओझर विद्यामंदिरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त संगीत कवायत, साक्षरता शपथ, कर्मचारी मतदार शपथ, मतदान जनजागृती फेरी, देशभक्तीपर गीते असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यासोबतच कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त शपथ, उत्तरपत्रिका लिहिण्याबाबत सामान्य सूचना, शिक्षा सूचीचे वाचन, आहारविषयक मार्गदर्शन तसेच आर्या राणे हिची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन, आदर्श उत्तरपत्रिका लेखन, दहावीची प्रश्नपत्रिका सोडविताना वेळेचे व्यवस्थापन तसेच मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ही मुलाखत घेण्यात आली. फेब्रुवारी–मार्च २०२५च्या शालान्त परीक्षेत टोपीवाला हायस्कूल, मालवण येथून जिल्ह्यात विभागून प्रथम आलेल्या आर्या राणे हिची ही प्रकट मुलाखत ओझर विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी आपल्या दिमाखदार शैलीत घेतली.
     या मुलाखतीत आर्या राणे हिने आपल्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेताना “क्रमिक पाठ्यपुस्तकांचे समजपूर्वक वाचन आणि प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सातत्यपूर्ण सराव हेच यशाचे खरे गमक आहे” असे सांगितले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा योग्य समन्वय साधला गेल्यास यश निश्चित मिळते, असेही ती म्हणाली. मुलाखतीदरम्यान विद्यार्थ्यांनी अभ्यासासंदर्भात प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
      अभियांत्रिकी क्षेत्राबरोबरच कथ्थक नृत्य या कला प्रकारामध्ये करिअर करण्याचा मानसही आर्या राणे हिने व्यक्त केला. या प्रसंगी ओझर विद्यामंदिर प्रशासनाच्यावतीने संस्थेचे विश्वस्त शरद परब यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे खजिनदार शरद परब, माजी विद्यार्थी विजय नातू, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव काळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पी. के. राणे यांनी मानले.

error: Content is protected !!