पिंगुळी मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळच्या सिद्धिविनायक हॉलमध्ये रविवारी पार पडलेला पिंगुळी मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा केवळ औपचारिक निरोप नव्हता, तर ३५ वर्षांच्या प्रामाणिक, निष्ठावान आणि माणुसकीने परिपूर्ण सेवेचा उत्सव ठरला. सभागृह खचाखच भरले होते. अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल तसेच देवगड ते सावंतवाडी-आंबोली, दोडामार्ग आदी भागांतील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आदर आणि डोळ्यांत भावुकता स्पष्ट दिसत होती.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने झाली. वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा प्रसंग रंगला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. शुभेच्छांच्या वर्षावात गुरव भाऊंच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा उमटली, मात्र डोळ्यांच्या कडांवरील ओलावा त्यांच्या मनातील भावनांची साक्ष देत होता.निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी मनोगत व्यक्त करताना पदोन्नती प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे गुरुनाथ गुरव यांना नायब तहसीलदार पदाची संधी मिळू शकली नाही, याची खंत व्यक्त केली. तुम्ही आमच्या मनातील नायब तहसीलदार, तहसीलदार आणि प्रांताधिकारी आहात, या शब्दांत त्यांनी उपस्थितांच्या भावना मांडल्या. एवढ्या मोठ्या संख्येने भरलेला सेवानिवृत्ती कार्यक्रम क्वचितच पाहायला मिळतो, असेही त्यांनी नमूद केले.प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे व्यासपीठावर उभ्या राहिल्या तेव्हा त्या भावुक झाल्या. काही क्षण त्यांना बोलता आले नाही आणि सभागृहात शांततेचा भावनिक क्षण पसरला. तहसीलदार सचिन पाटील यांनी गुरव यांना माझ्या आवडत्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असे संबोधत त्यांच्या साधेपणाचे आणि कामातील निष्ठेचे कौतुक केले.
गुरुनाथ गुरव यांनी आपल्या मनोगतात महसूल विभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या विभागाने मला मान-सन्मान दिला, त्यामुळे मला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. सेवाकाळातील सुरुवातीचे दिवस आठवत त्यांनी कोतवाल प्रकाश घाडी यांच्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख केला. आज मी इथपर्यंत आलो, ते त्यांच्या मार्गदर्शनामुळेच,असे सांगत त्यांनी प्रकाश घाडी, बाबू चव्हाण आणि देवगड येथील एका ज्येष्ठ व्यक्तीचा सत्कार करून ऋणनिर्देश केला.
मी ३५ वर्षांची सेवा पूर्ण केली. आज मिळालेल्या शुभेच्छा आयुष्यभर पुरतील,या त्यांच्या शब्दांनी उपस्थितांची मने हेलावली. विविध वक्त्यांनी गुरव भाऊंच्या साधेपणाचा, कुटुंबवत्सल स्वभावाचा आणि ‘काम सांगितलं की पूर्ण करणारच’ या त्यांच्या वृत्तीचा उल्लेख करत त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि डोळ्यांत कृतज्ञतेचा ओलावा स्पष्ट दिसत होता. अडीच तास चाललेल्या या भावनिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी श्री. गंगावणे यांनी केले व आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.









