एबी फॉर्म शेवटच्या क्षणी; नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी
मालवण तालुक्यात १११ मतदान केंद्रे निश्चित
मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २८ आणि पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारांना सर्वच पक्षांकडून शेवटच्या दिवशी उमेदवारी निश्चिती करण्याबरोबरच पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म देण्यात आल्यामुळे अर्ज भरण्याचे शेवटच्या दिवशी मालवण तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली. दरम्यान जिल्हा परिषद ६ आणि पंचायत समितीच्या १२ जागांसाठी मालवण तालुक्यातून १११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
भाजपा आणि शिंदे शिवसेनेच्या युतीमुळे तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी महायुतीच्या अधिकृत सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये मसुरे मर्डे जिल्हा परिषद मतदार संघातून भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला तर उर्वरित आडवली माडली, आचरा, पेंडूर, वायरी भूतनाथ या जिल्हा परिषद मतदार संघातून शिंदे सेने कडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भारतीय जनता पार्टी कडून पंचायत समितीसाठी वायरी भूतनाथ , कोळंब, चिंदर, आडवली मालडी, सुकळवाड, वराड या सहा पंचायत समिती मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर शिरवंडे, आचरे मसुरे मर्डे, पोईप, पेंडूर, कुंभारमाठ या शिंदे सेनेने आपले उमेदवार उभे केले. ठाकरे शिवसेनेकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात आले.
अनेक मतदार संघात सर्वच पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी झाल्यामुळे उमेदवार निश्चित करण्यामध्ये प्रमुख नेत्यांची दमछाक झाल्याचे पहावयास मिळाले. अखेरपर्यंत काही मतदारसंघात अनेक उमेदवार उमेदवारीसाठी इच्छुक असल्यामुळे शेवटपर्यंत तोडगा निघत नव्हता. शेवटी चिठ्ठी उडवून उमेदवार निश्चित करण्यात आले. पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी सर्व पक्षांनी शेवटच्या दिवशी निश्चित केलेल्या उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म देणे पसंत केले. यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती मात्र अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे कार्यालयात उपस्थित असलेल्या उमेदवारांना टोकन देण्यात आले आणि उशिरापर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. मालवण मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शारदा पोवार तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मालवण तहसीलदार गणेश लव्हे काम पाहत आहेत.









