१६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल ; १०० मीटर परिसरात निर्बंध
नामनिर्देशन पत्र दाखल करताना चारच व्यक्तींना प्रवेश;
नामनिर्देशन काळात पोलीस बंदोबस्त
कुडाळ : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या सुचने नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग व कुडाळ पंचायत समिती निवडणूक गणामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार शुक्रवार दि. १६ जानेवारी ते बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे तहसीलदार कार्यालय, कुडाळ येथे तहसीलदार यांचे दालन, तळमजला येथे स्विकारली जाणार आहेत, अशी माहीती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.
रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुटी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाहीत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नामनिर्देशन पत्र भरण्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी किंवा त्यांच्या सोबतच्या व्यक्तींच्या वाहनांची संख्या जास्तीत जास्त दोन एवढी निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र भरताना उमेदवार व सूचक यांच्यासोबत जास्तीत जास्त दोन व्यक्तींनाच (एकूण चार व्यक्ती) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. दिनांक १६ ते दि.२१ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत १०० मीटरच्या परिसरात कुठलीही खाजगी आस्थापना सुरु ठेवू नयेत. नागरीकांनी/अभ्यागतांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या १०० मीटर मधील शासकीय व खाजगी कार्यालयातील कामे अत्यावश्यक नसल्यास या दिवशी व वेळेत शक्यतो टाळावीत. अभ्यागतांचे संबंधित कार्यालयाकडे काम जर अत्यावश्यक असेल तर पोलिस विभागाने निश्चित केलेल्या पार्किंग क्षेत्रामध्ये स्वतःकडील वाहन पार्क करून संबंधित कार्यालयाकडे पायी यावे. निवडणूक सारखी संवेदनशील बाब असल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी अनावश्यक नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी सदरचे निर्देश देण्यात येत आहेत. जेणेकरुन प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची देखील कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. वैद्यकीय आपत्कालीन सेवा व इतर आपत्कालीन सेवेतील वाहनांना याबाबत मुभा देण्यात आलेली असून रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली वाहने पोलिस विभागाने निश्चित केलेल्या पाकींग क्षेत्रात पार्क करून रुग्णालयात जाण्याचे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय व परिसर सी.सी.टी.व्ही.च्या निगराणीत घेण्यात आलेला असून आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार व नागरीकांनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.








