ठळक घडामोडी

कुडाळ येथे साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त प्रभात फेरी!

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलतर्फे आयोजन

कुडाळ : प्रतिनिधी
     साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ एमआयडीसी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी कुडाळ शहरात बुधवारी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
      प्रभात फेरीची सुरुवात शाळेच्या परिसरातून झाली. एमआयडीसी परिसरातून मार्गक्रमण करत ही फेरी कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचली व पुढे कुडाळ एस.टी. स्टँड परिसरात रॅलीचा समारोप झाला. एस.टी. स्टँडजवळ सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र आल्यानंतर प्रा. नितीन बांबार्डेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्याचे महत्त्व विशद करताना समाजाप्रती सहृदयता व संवेदनशीलतेची आवश्यकता अधोरेखित केली. “जगाला प्रेम अर्पण करणे हाच खरा धर्म आहे. ‘पर दुखे दुखी व्हावे, पर सुखे सुखी व्हावे’ ही भावना अंगीकारून समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच साने गुरुजींच्या विचारांची खरी शिकवण आहे,” असे त्यांनी सांगितले. साने गुरुजींनी दिलेली संस्कृतीची शिकवण आजच्या कुटुंबात व लहान मुलांमध्ये रुजवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद करून साने गुरुजींना मानवंदना दिली.
    या प्रभात फेरीदरम्यान “खरा तो एकची धर्म” व “आता उठवू सारे रान” या प्रार्थना म्हणत साने गुरुजींच्या विचारांचा जागर करण्यात आला. बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या सौ. चैताली बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभात फेरी यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी शिक्षकवृंदातील प्रिया केटगाळे, मधुरा इन्सुलकर, प्रसाद कानडे, विश्वजीत डांगमोडेकर यांच्यासह अन्य शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या प्रभात फेरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये साने गुरुजींच्या विचारांची ओळख निर्माण झाली असून सामाजिक मूल्ये व मानवतेचा संदेश समाजात पोहोचवण्याचा उद्देश सफल झाला आहे, असे आयोजकांनी सांगण्यात आले.

error: Content is protected !!