
नेरूरच्या निसर्गसौंदर्यात हसत-खेळत घालवला एक दिवस
जेष्ठ नागरिक संघ नेरूरचा स्तुत्य सामाजिक उपक्रम
कुडाळ : प्रतिनिधी
जेष्ठ नागरिक संघ नेरूर यांच्या वतीने नेरूर मधील सर्व ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिलांसाठी एक दिवस आनंदात, हसत-खेळत आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने रविवारी वनभोजनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ बाजूला काढत निसर्गाच्या सान्निध्यात मनमोकळेपणाने वेळ घालवावा, एकमेकांशी संवाद साधावा तसेच सामाजिक नाते दृढ व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. वनभोजनस्थळी पोहोचताच सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकांच्या गप्पा, आठवणी आणि अनुभव शेअर करत कार्यक्रमाचा आनंद घेतला. अनेक ज्येष्ठांनी आपल्या आयुष्यातील अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरणा दिली. वातावरणात आनंद, उत्साह आणि आपुलकीची भावना दिसून येत होती. वनभोजनासाठी सर्वांसाठी रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. अशा उपक्रमांमुळे मानसिक समाधान मिळते व आरोग्यदृष्ट्याही सकारात्मक परिणाम होतो, असे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जेष्ठ नागरिक संघ नेरूरच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सहभागींचे आभार मानले. भविष्यातही ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा सामाजिक व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.








