व्हिजन सत्यात उतरल्यास येत्या पाच वर्षात शहराचा कायापालट होईल
शहर विकासासाठी नगराध्यक्षांची जबाबदारी वाढली
मालवण : प्रतिनिधी
मालवण शहराच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी एक मोठे व्हिजन ठेवले आहे. निवडणूक काळात त्यांनी सादर केलेली ‘व्हिजन डॉक्युमेंटरी’ जर पूर्णत्वास आली, तर येत्या पाच वर्षात मालवणचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी गुरूवारी मालवण येथे केले. येथील पालिकेत नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या पदभार सोहळ्यात ते बोलत होते.
आपल्या नऊ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत आठवणींना उजाळा देताना २५ डिसेंबर २०१६ रोजी मी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडून येत पदभार स्वीकारला होता. आज योगायोगाने हीच निशाणी नूतन नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याकडे सोपवताना मला आनंद होत आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ आणि त्यानंतरची चार वर्षे प्रशासकीय राजवट असूनही मी सातत्याना जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता ही जबाबदारी वराडकर यांच्यावर असून शहराच्या विकासासाठी त्यांची जबाबदारी वाढली आहे, असे कांदळगावकर म्हणाले.
निवडणुकीतील विजयाचे श्रेय देताना त्यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, दत्ता सामंत यांनी वाड्यावाड्यात जाऊन अत्यंत प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली. त्यांच्या या मेहनतीमुळेच आज हे यश मिळाले आहे. ‘दत्ता सामंत कोण अशी विचारणा करणाऱ्या विरोधकांना त्यांच्या या कार्यातून आणि निकालातून चपराक बसली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.









