ठळक घडामोडी

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घ्यावा!

कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
       दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर संबंधित कुटुंबाला केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. पात्र कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
     केंद्र शासनाने १५ ऑगस्ट १९९५ पासून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू केली असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. ग्रामीण तसेच शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबास एकरकमी २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्यू दिनांकापासून तीन वर्षांच्या आत संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत अथवा थेट तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज, मृत्यू दाखला, वयाचा पुरावा (आधारकार्ड/शाळा सोडल्याचा दाखला), दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला, मयत कुटुंब प्रमुखाच्या पश्चात जिवीत कुटुंब प्रमुखाबाबत ग्रामपंचायतीचा दाखला, अर्जदाराच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधारकार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे, असे तहसीलदार श्री.पाटील यांनी नमूद केले आहे.
    तसेच महसूल विभागामार्फत दि. ०७ मार्च २०२६ ते दि. १५ मे २०२६ या कालावधीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येत असून या अभियानातही राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा समावेश करण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!