आगीत साहित्य जळून खाक; सुदैवाने अनर्थ टळला
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय; ग्रामस्थांची तत्परता

कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथील रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला शनिवारी सकाळी अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.
या आगीत घराचा काही भाग जळून खाक झाला असून कपडे, गाद्या, फ्रिज व अन्य संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. घराला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन पाण्याच्या सहाय्याने आग विजविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वेताळबांबर्डे सरपंच वेदिका दळवी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गावडे, सृष्टी सावंत, जागृती गावडे, साजुराम नाईक, तसेच ग्रामपंचायत अधिकारी शालिनी कोकरे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.









