ठळक घडामोडी

कुडाळमधील ते गॅस चेंबर तातडीने हटवणार!

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची शिव प्रेमींना ग्वाही
कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या राजमाता जिजाऊ चौकात धोकादायक स्थितीत असलेले गॅस चेंबर त्वरित हटवण्यात यावे, या मागणीसाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत, सदरचे चेंबर तेथून तातडीने हटविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शिवप्रेमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न.पं. कार्यालयात नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे त्यांचे लक्ष वेधले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. नागरिकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असून, राजमाता जिजाऊ चौकातील गॅस चेंबर तातडीने हटवण्यात येईल, असे आश्वासन देऊन, प्रशासनातील संबंधित अधिका-यांना तातडीने कार्यवाही करून राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील सदरचे गॅस चेंबर हटविण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. यावेळी नगरसेविका सौ. नयना मांजरेकर, नगरसेवक गणेश भोगटे, शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे रमाकांत नाईक, भावना वेळेकर, साईप्रसाद मसगे, श्री. किरण कुडाळकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!