ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक पिता-पुत्र बचावले
डंपरचा पाठलाग करीत दिला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात; राजन नाईकांची कारवाईची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरात आज बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी भरदुपारी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने थरार निर्माण केला. शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर जवळ रस्त्यालगत उभे असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष राजन नाईक आणि त्यांच्या मुलाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेथील ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने दोघेही थोडक्यात बचावले.
राजन नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाव-कुडाळ मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरचा चालक मोबाईलवर बोलण्यात मग्न होता. त्याचवेळेस त्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या आपल्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. नंतर डंपरचा वेग कमी न करता तो पंचायत समितीच्या दिशेने डंपर घेऊन जात होता. दरम्यानच्या वेळी राजन नाईक यांनी सहकाऱ्यांसह पाठलाग केला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर ते गुलमोहर हॉल मार्गावर मोटारसायकल आडवी लावून डंपर रोखण्यात आला. यावेळी श्री.नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत सदर डंपर चालकाला चांगलाच जाब विचारला. यानंतर राजन नाईक यांनी कुडाळचे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलिसांना याबाबतची कल्पना देताच प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. संबंधित डंपर सध्या कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, कारवाईची मागणी करण्यात आल्याची माहीती श्री.नाईक यांनी दिली आहे.








