सावरवाड तिठा–वराड रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सावरवाड तिठा ते वराड या रस्ता सुधारणा काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तातडीने काम पूर्ण करण्यासह दर्जेदार काम केले जावे, या मागणीसाठी मालवण तालुक्यातील वराड ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी आज (गुरुवारी) कुडाळ मधील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्गच्या कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडले.
वराड ग्रामपंचायतीमार्फत प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात सावरवाड तिठा ते वराड या रस्त्याच्या सुधारणा कामास सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असून वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून दखल घेतली गेलेली नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास वाहनचालक व पादचाऱ्यांना नाही त्रास सहन करावा लागेल तसेच अपघाताची शक्यता वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर वराड ग्रामस्थांनी कुडाळ येथे हे लाक्षणिक उपोषण छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. पं. स. सदस्या माधुरी मसुरकर, वराडच्या सरपंच सौ. शलाका रावले, उपसरपंच गोपाळ परब, सदस्य किरण रावले, बाबू सरमळकर, नंदन केसरकर, किशोरी भगत, रिया वराडकर यांच्यासह माजी सरपंच बबन मिठबांवकर, राजन माणगावकर, समीर रावले, अशोक पराडकर, विजय पालव, विकास वराडकर, जगदीश परब, गोट्या मसुरकर, प्रकाश म्हाडगूत, सागर सावंत, शुभम मसुरकर, प्रकाश परब, वसंत वराडकर, सुशील आचरेकर, मामा बांदिवडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपोषणात सहभाग घेतला. या उपोषणाला पेंडूर जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.
दरम्यान उपअभियंता श्री. भोसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र रस्त्याचे काम प्रशासनाने तातडीने पूर्ण केले नाही तर येत्या काळात रास्ता रोको आंदोलनासह बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.









