ठळक घडामोडी

कुडाळ येथील राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील परिसराचे विद्रुपीकरण!

एमएनजीएलच्या मनमानी कारभाराविरोधात शिवप्रेमींचा संताप : नगरसेविका संध्या तेरसेंचा जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

कुडाळ : प्रतिनिधी

            कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथील राजमाता जिजाऊ स्मारकासमोर एमएनजीएल (MNGL) कंपनीमार्फत रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या सुमारे चार इंच उंच चेंबरमुळे परिसराचे विद्रूपीकरण झाल्याचा आरोप करीत नगरसेविका संध्या तेरसे यांच्यासह शिवप्रेमी संघटनेने शनिवारी तीव्र संताप व्यक्त केला. सदर चेंबर तात्काळ हटवून परिसर पूर्ववत सुस्थितीत करावा, अशी आग्रही मागणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने ती मान्य केली.

       शुक्रवारी एमएनजीएलमार्फत स्मारकासमोरील रस्त्यावर खोदाई करून चेंबर उभारण्यात आला होता. रस्त्याच्या वळणावर उंच चेंबर उभारल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अडखळून पडण्याची शक्यता असल्याचे शिवप्रेमींनी सांगितले. याची दखल घेत नगरसेविका संध्या तेरसे यांनी रात्रीच घटनास्थळी पाहणी करत संताप व्यक्त केला. सदर चेंबर त्या ठिकाणावरून हटवून दुसऱ्या ठिकाणी उभारावा, तसेच राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील परिसर व रस्ता तात्काळ सुस्थितीत करावा, अन्यथा कुडाळ शहरात एमएनजीएलचे एकही काम होऊ देणार नाही, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला. त्यानंतर शनिवारी सकाळी ठेकेदार व कंपनीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.

       यावेळी नगरसेविका तेरसे यांच्यासह शिवप्रेमी संघटनेचे रमाकांत नाईक, विवेक पंडित, स्वरूप वाळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ठेकेदार प्रशासनाला जाब विचारत चेंबर तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली. अखेर संबंधित ठेकेदाराने चेंबर दुसऱ्या बाजूस उभारून परिसरात काँक्रिटीकरण करून जागा पूर्ववत सुस्थितीत करण्याचे मान्य केले. दरम्यान, एमएनजीएलमार्फत शहरात सुरू असलेल्या कामांबाबत नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी नगरसेविका तेरसे यांनी व्यक्त केली. शहरात कुठे खोदाई करायची, चेंबर कुठे उभारायची, याची माहिती नगरपंचायतीला नसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा नकाशा हातात घेतल्याशिवाय व नगरपंचायतीला विश्वासात न घेता एमएनजीएलचे कोणतेही काम होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. एमएनजीएलच्या मनमानी कारभाराबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे रीतसर तक्रार करणार असल्याचा इशाराही यावेळी नगरसेविका संध्या तेरसे यांनी दिला.

error: Content is protected !!