ठळक घडामोडी

‘सक्षम 2025-26’ अभियानातून ऊर्जा सुरक्षेला चालना!

रोहित कांबळे यांची कुडाळमध्ये माहीती; इंधन बचतीचा संदेश

कुडाळ : प्रतिनिधी
       भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम 2025-26 (संरक्षण क्षमता महोत्सव)’ या राष्ट्रीय अभियानाच्या उद्दिष्टांबाबत इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी रोहित कांबळे यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. कुडाळ येथील लक्ष्मी नारायण पेट्रोल पंप येथे गुरुवारी ही पत्रकार परिषद पार पडली.
        यावेळी ‘सक्षम संरक्षण समता महोत्सवा’निमित्त उपस्थितांनी इंधन बचतीची प्रतिज्ञा घेतली. पत्रकार परिषदेस लक्ष्मी नारायण पेट्रोल पंपाचे मालक ओंकार देसाई तसेच पालव पेट्रोलियमचे मालक जयभारत पालव उपस्थित होते.
     श्री. कांबळे यांनी सांगितले की, ‘सक्षम 2025-26’ हा देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी, शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे, इंधनाची बचत करणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशभर हा महोत्सव साजरा केला जात असून “Conserve Fuel, Save the Future” हा यंदाचा संदेश आहे. या कालावधीत शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा तसेच इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एलपीजी ग्राहक, वाहनचालक, ट्रान्सपोर्टर, शेतकरी तसेच उद्योग क्षेत्रातील कर्मचारी आदी विविध घटकांपर्यंत इंधन बचतीचे महत्त्व पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. इंधन कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन रोहित कांबळे यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!