ठळक घडामोडी

दोडामार्गमध्ये चोरीचा प्रयत्न; व्यापारी व नागरिक संतप्त

बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत नागरिकांची नाराजी

तातडीने सीसीटीव्ही सुरू न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा

दोडामार्ग : प्रतिनिधी
       दोडामार्ग येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यकांत परमेकर यांचे दुकान बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे पत्र्याचे शटर मोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र शटर न उघडल्याने चोरट्यांचा डाव फसला.
      गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे दूकान उघडण्यासाठी गेले असता, दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी संतप्त व्यापारी व नागरिकांनी थेट दोडामार्ग पोलीस ठाणे गाठले. शहरातील बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत नागरिकांनी पोलिसांना जाब विचारत चांगलेच फैलावर घेतले. वरिष्ठ पातळीवर सीसीटीव्ही सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
     गेल्या १५–२० दिवसांत दोडामार्ग शहर व तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या असून अद्याप एकाही प्रकरणाचा छडा लागलेला नाही. बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने सर्व सीसीटीव्ही सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी व नागरिकांनी दिला आहे.

error: Content is protected !!