गांगो ते रवळनाथ रिंगरोडची प्रत्यक्ष पाहणी; अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
कणकवली : प्रतिनिधी
कणकवली शहरातील सुरू असलेली विकासकामे कोणताही अडथळा न आणता जलदगतीने, नियोजनबद्ध व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील, असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
शहरातील गांगो मंदिर ते रवळनाथ मंदिर रिंगरोडवरील गटार, रस्ता व इतर कामांची त्यांनी आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीवेळी नगरपंचायतीचे अभियंता सचिन नेरकर, ठेकेदार जावेद शेख, तेजस राणे, सहदेव बागवे, दिलीप साटम तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान गटारांची कामे टिकाऊ व दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या. धोकादायक वळणे दुरुस्त करणे, रस्ते रुंदीकरण, सांडपाणी व्यवस्थापन व विद्युत पोल हटवण्याबाबतही चर्चा करण्यात आली. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी यावेळी स्पष्ट केले.









