ठळक घडामोडी

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा शिडकावा

आंबा-काजू पिकांना फटका बसण्याची भिती

अचानक ढगाळ वातावरणामुळे बागायतदार चिंतेत

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
     कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्हाभरात सोमवारी सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसेच कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा हलकासा शिडकावा झाला. त्यामुळे अवकाळी पावसाच्या हजेरीने ऐन हंगामात असलेल्या आंबा, काजू, कोकम पिकांवर मोठा परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
      उन्हाळा सुरू झाला असतानाही सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपर्यंत थंडीचे वातावरण होते. गेल्या दोन दिवसांपासून अचानक वातावरणात बदल निर्माण होऊन उष्मा वाढला. जिल्ह्याच्या काही भागात रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर सोमवारी सकाळपासूनच कुडाळसह जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. कुडाळ तालुक्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत दमट व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. याचवेळेस मूळदे, आंबडपालसह तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. तर सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास आंदुर्ले, तेंडोलीसह विविध भागात पावसाचा शिडकावा झाला. यावेळी वातावरणात अचानक बदल निर्माण होऊन पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. या अवकाळी पावसाच्या हजेरीने आंबा, काजू, कोकम पिकाला मोठा फटका बसण्याची भिती निर्माण होत आहे.

error: Content is protected !!