ठळक घडामोडी

मुंबईत रंगणार ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी!

२९ व ३० जानेवारीला स्पर्धा; ८ लाखांची रोख पारितोषिके जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
      महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५–२०२६ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा श्री हालारी ओसवाल समाज, दादासाहेब फाळके रोड, रणजीत स्टुडिओसमोर, दादर (पूर्व), मुंबई येथील वातानुकूलित सभागृहात पार पडणार आहे.
    या स्पर्धेत पुरुष व महिला खेळाडूंसाठी खुला गट ठेवण्यात आला असून एकूण ८ लाख रुपयांची रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. विजेत्यास १ लाख ५० हजार रुपये, उपविजेत्यास १ लाख रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी ७५ हजार रुपये व चषक, तर चतुर्थ क्रमांकासाठी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. उपउपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार, उपउपांत्यपूर्व फेरीसाठी १० हजार, तर त्याआधीच्या फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी ५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीपासून व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूस १ हजार रुपये, तर उपउपांत्य फेरीपासून हे बक्षीस २ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. महिला खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिला खेळाडूला १ हजार, तिसऱ्या फेरीसाठी २ हजार, चौथ्या फेरीसाठी ४ हजार, पाचव्या फेरीसाठी ८ हजार व सहाव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस १५ हजार रुपयांचे अतिरिक्त बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिस्का कंपनीच्या शुअर स्लॅम कॅरम बोर्ड व बुलेट शॉट सोंगट्या वापरून खेळविण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांतील यशस्वी आयोजनामुळे या स्पर्धेला खेळाडूंकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडून गणवेश देण्यात येणार असून चहा-नाश्ता व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असली तरी मर्यादित खेळाडूंनाच प्रवेश देण्यात येणार असून इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा कॅरम संघटनेमार्फत नावे नोंदवावीत, असे आवाहन महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी केले आहे.

error: Content is protected !!