३० डिसेंबरला विशेष सभा
भाजप–शिंदे शिवसेनेत हालचालींना वेग
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवड प्रक्रियेसाठी मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली आहे. विषय समिती सभापतीची निवड झाल्यानंतर स्थायी समितीही गठीत केली जाणार आहे.
दि. १० डिसेंबर २०२५ रोजी विषय समिती सभापती पदाची मुदत संपुष्टात आल्यामुळे ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निवडीसाठी दुपारी १२ ते २० मिनिटे या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे सादर करावयाची असून त्यानंतर दुपारी २ वाजता निवडीसाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे. सध्या कुडाळ नगरपंचायतीतील पक्षीय बलाबल पाहता विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध होणार की प्रत्यक्ष निवडणूक लागणार, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीतील राजकीय हालचालींना वेग आला असून सत्ताधारी भाजप व शिंदे शिवसेना या पक्षांमध्ये हालचाल सुरू झाली आहे.









