नेरूर मतदारसंघातील विजयानंतर पावसकर यांनी मानले मतदार जनतेचे आभार
जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याची दिली ग्वाही
कुडाळ : प्रतिनिधी
नेरूर देऊळवाडा जि.प. मतदार संघात अपक्ष उमेदवार रूपेश पावसकर यांनी विजय मिळवला आहे. हा विजय माझा नाही, स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवला आणि माझ्या कष्टाला आज माझ्या मायबाप जनतेने कौल दिला आहे. हे पद माझे नसून, जनतेच्या सेवेचे साधन आहे. दिलेला विश्वास आयुष्यभर सार्थ ठरवेन, असे सांगत नवनिर्वाचित जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले.
निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना श्री. पावसकर म्हणाले की हा निकाल केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही, तर तो सामान्य माणसाच्या शक्तीचा विजय आहे. माझ्यावर राहिलेली श्री देव कलेश्वर, माऊली, लक्ष्मीनारायण, सातेरी, प.पु. राऊळ महाराज यांची कृपा. कोणत्याही मोठ्या राजकीय व्यक्तीचे पाठबळ पाठीशी नसताना, केवळ तुमच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या जोरावर मी आज जिल्हा परिषदेच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहे. मी एकटा लढत नव्हतो, तर माझ्या पाठीशी प्रत्येक तो माणूस होता ज्याला विकासाची आस आहे. माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही सगळे असंख्य कार्यकर्ते यांचा मला सार्थ अभिमान आहे. मी सर्व मतदारांचा आयुष्यभर ऋणी राहील आपण दिलेला हा विश्वास असाच सार्थ करीन. प्रचाराच्या काळात तुम्ही दिलेला कपभर चहा असेल, पाठीवर मारलेली शाबासकीची थाप असेल किंवा ‘आम्ही तुझ्यासोबत आहोत’ हा दिलेला शब्द असेल… याच गोष्टींनी मला लढण्याचे बळ दिले, असेही त्यांनी नमूद केले.
अपक्ष आहे, पण हतबल नाही. पक्षाचे बंधन नसल्यामुळे माझा पहिला शब्द फक्त आणि फक्त माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी असेल. विकासाचा ध्यास: रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांसाठी मी अहोरात्र झटेन, अशी ग्वाहीही त्यांनी जनतेला दिली आहे
विजयाचा गुलाल उतरला तरी, जनतेच्या सुखा-दुखात धावून येणारा तुमचा हक्काचा माणूस म्हणून मी कायम उपलब्ध असेन. मतदार जनतेचा हा विश्वास मी सार्थ ठरवेन. हे पद माझे नाही, तर हे जन सेवेचे साधन आहे, असे सांगत पावसकर यांनी मतदारसंघातील जनतेचे आभार मानले.









