ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जि.प.वर महायुतीचा झेंडा; प्रमोद कामत अध्यक्ष, दादा साईल उपाध्यक्ष बिनविरोध निश्चित

भाजप-शिवसेना महायुतीचा सिंधुदुर्ग जि.प.वर प्रभाव

विशेष सभेत निवड प्रक्रियेनंतर होणार अधिकृत घोषणा

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
     सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदासाठी पावशी मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेच्या तुकाराम उर्फ दादा साईल या दोघांनी महायुतीकडून निवडणूक निर्णय अधिका-यांकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले. या पदांसाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुपारी होणा-या विशेष सभेत निवडणूक प्रक्रियेनंतर अधिकृत निवड जाहीर होणार आहे.
      जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक कार्यक्रम होत आहे. जिल्हा परिषदेत महायुतीचे वर्चस्व आहे. जि.प.चा अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच भाजप नेते खा.नारायण राणे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्याकडून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे प्रमोद कामत व दादा साईल यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. दोघांनीही महायुतीतर्फे आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.एम.नाईक काम पाहत आहेत.
     दुपारी तीन वाजता जि.प.ची विशेष सभा होणार असून यावेळी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिका-यांकडून निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
     दरम्यान, जिल्हा परिषद परिसरात जिल्हाभरातून भाजप – शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात झाली असून, थोड्याच वेळात जल्लोष पाहायला मिळणार आहे.

error: Content is protected !!