दोडामार्ग भाजप नगरसेवक राजू प्रसादी व अज्ञात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
डंपर गोवा हद्दीत पळाला; महसूल अधिकाऱ्याची पोलिसांत धाव
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी लिलाचंद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोडामार्ग भाजपचे नगरसेवक राजू प्रसादी व एका अज्ञात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहीती पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.
२५ डिसेंबर रोजी सायंकाळी अवैध गौण खनिज वाहतूक करणारा डंपर थांबवून तपासणी करत असताना हा प्रकार घडला. वाळू वाहतुकीचा पास नसल्याचे आढळून आल्यानंतर राजू प्रसादी यांनी महसूल अधिकाऱ्यांशी वाद घालून धक्का-बुक्की व मारहाण केल्याचा आरोप आहे. या झटापटीत श्री. जाधव यांच्या हाताला दुखापत झाली असून, आरोपींच्या सांगण्यावरून डंपर गोवा हद्दीत पळून गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३२, २२१(१), ५४ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत, अशी माहिती पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.








