१,१८२ ग्राहकांचा वीजपुरवठा केला तात्पुरता खंडित
ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे; महावितरणचे आवाहन
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1 लाख 67 हजार 825 ग्राहकांकडे 25 कोटी 91 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडल अंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील 1 हजार 182 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.
यामध्ये रत्नागिरी परिमंडल अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती 1 लाख 46 हजार 277 ग्राहकांकडे 14 कोटी 51 लाख, व्यावसायिक 14 हजार 400 ग्राहकांकडे 5 कोटी 25 लाख, औद्योगिक 1 हजार 639 ग्राहकांकडे 3 कोटी 28 लाख, सार्वजनिक सेवा 5 हजार 150 ग्राहकांकडे 2 कोटी 60 लाख आणि इतर वर्गवारीतील 359 ग्राहकांकडे 27 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विभागात 43 हजार 843 ग्राहकांकडे 05 कोटी 84 लाख, चिपळूण विभागात 24 हजार 648 ग्राहकांकडे 3 कोटी 31 लाख, खेड विभागात 26 हजार 375 ग्राहकांकडे 03 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 708 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात 34 हजार 851 ग्राहकांकडे 06 कोटी 12 लाख, कुडाळ विभागात 38 हजार 108 ग्राहकांकडे 07 कोटी 04 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 474 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे.
थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च 2026 अखेरपर्यंत शनिवारी , रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रक्कमेवर 0.25 टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. या व्यतिरिक्त महावितरणने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे, अशी माहीती महावितरणकडून देण्यात आली आहे.









