ठळक घडामोडी

देवगड – दहिबावमध्ये गंगा अवतरली; भाविकांची मोठी गर्दी!

राजापूरनंतर दहिबाव गंगाक्षेत्रात गंगामाईचे आगमन

देवगड : प्रतिनिधी
     देवगड तालुक्यातील दहिबाव येथे गंगाक्षेत्रावरील कुंडात गंगा अवतरली असून तेथे भाविकांची गर्दी होत आहे. अनेक भाविकांनी तेथे स्नानाची पर्वणी साधली. राजापूर येथे गंगा अवतरल्यानंतर आठ दिवसांच्या अंतराने दहिबाव येथील गंगाक्षेत्रात गंगा अवतरली आहे. दरम्यान, यापूर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईचे आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखित झाले आहे.
       १ एप्रिलपासूनच दहिबाव येथील गंगाक्षेत्रावरील कुंडामध्ये गंगा अवतरीत झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. गंगा येण्यापूर्वी कुंडातील पाणी दूधाळ होते. सध्या हे गंगाकुंड पाण्याने तुडूंब भरून वाहत आहे. कुंडाच्या गोमुखातूनदेखील पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे. गंगा अवतरल्याचे वृत्त परिसरात पसरताच भाविक गंगाक्षेत्रावर गर्दी करून लागले आहेत. गेल्या काही वर्षात गंगेचे आगमन व गमन कालखंडात बदल झाला असल्याचे पहावयास मिळत असून या कालावधीत तिच्या वास्तव्याचा कालावधीही वाढला होता. शिवाय तिचे सलग आगमन झाल्याचेही पहावयास मिळाले होते. गंगेच्या आगमनाबाबत पूर्वापार कथा प्रचलित आहेत. दरम्यान, गंगाक्षेत्रानजीकच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!