ठळक घडामोडी

कुडाळ मधील ते धोकादायक गॅस चेंबर हटवण्याचे काम जोरात सुरू!

नगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी : शिवप्रेमींमधून समाधान व्यक्त
कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या राजमात जिजाऊ चौकात एमएनजीएल कंपनी मार्फत बांधण्यात आलेले धोकादायक गॅस चेंबर हटवण्याच्या कामाला गुरूवार पासून सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहीती कुडाळच्या नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.
    शहरातील राजमाता जिजाऊ चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. याच ठिकाणी राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील जागेत रस्त्यालगत एमएनजीएल कंपनीने बसवलेल्या गॅस चेंबरमुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता होती. याबाबत मंगळवारी शहरातील शिवप्रेमींनी नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांचे लक्ष वेधत सदर गॅस चेंबर त्या ठिकाणाहून हटवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. यावर नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर चेंबर तातडीने हटवण्यात येईल असे आश्वासन देत, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना चेंबर हटविण्याच्या कार्यवाहीबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सदर धोकादायक गॅस चेंबर हटवण्याचे काम गुरूवारी संबंधीत कंपनीमार्फत युध्दपातळीवर हाती घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका नयना मांजरेकर, न.पं. आणि कंपनी प्रशासनाचे अधिकारी, शिवप्रेमी रमाकांत नाईक, श्री. पांचाळ आदी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील सदरचे चेंबर हटविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!