पुस्तकातून उलघडला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जीवनप्रवास
कुडाळ : प्रतिनिधी
कोकणचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारीत अॅड. नकुल पार्सेकर यांनी लिहिलेल्या ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, छत्रपती शिवाजी पार्क, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
याबाबतची माहीती पुस्तकाचे लेखक अॅड.नकुल पार्सेकर यांनी शुक्रवारी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुस्तक प्रकाशन सोहळा संयोजन समितीचे संजीव कर्पे व मोहन होडावडेकर उपस्थित होते. अॅड.पार्सेकर म्हणाले, हा पुस्तक प्रकाशन सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी विख्यात वास्तुविशारद शशी प्रभु, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डचे संचालक सतीश मराठे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, अर्थतज्ञ तथा व्यवस्थापकीय संचालक (कालनिर्णय) जयराज साळगावकर, जेष्ठ सनदी लेखपाल तथा एसबीआय माजी संचालक प्रफुल्ल छाजेड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पुस्तकाची प्रस्तावना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राजीव खांडेकर, श्री.माशेलकर यांची असून प्रकाशनासाठी स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे व श्री वर्धमान श्रृतगंगा ट्रस्ट संजय शाह यांचे सहकार्य मिळाले आहे. जवळपास पावणेदोनशे पानांचे हे पुस्तक असून २० टाॅपीक्स आहेत. यात सुरेश प्रभू यांचा संपूर्ण जीवनप्रवास, त्यांचे कार्य आदी सर्वसमावेशक बाबींचा समावेश आहे, असे अॅड.पार्सेकर यांनी सांगितले.









