ठळक घडामोडी

सिंधुदुर्गाच्या राजकारणात शक्तीची चाचपणी; राणे समर्थक उद्या एकवटणार!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
     सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थक कार्यकर्ते एकवटत उद्या रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ ‘जय नारायण…’ या टॅगलाईनखाली रविवारी बांदा ते कणकवली भव्य रॅली काढण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकच नारा, अशा आशयाचे बॅनर्स मुंबई गोवा महामार्गावरील महाराष्ट्र व गोवा सीमेवरील बांदा येथे झळकले आहेत.
     या रॅलीच्या नियोजनासाठी कणकवली व कुडाळ तालुक्यात राणे समर्थकांच्या बैठका घेण्यात आल्या. तसेच सोशल मीडियावर ‘जय नारायण’, ‘आमची ओळख राणे कुटुंबीय’ अशा आशयाचे पोस्टर व व्हॉट्सॲप स्टेटस झळकत आहेत. याबाबतचे फोटो सोशल मीडियावरही झळकले आहेत. या रॅलीत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे एकत्रित कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत करण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. हजारो वाहनांचा ताफा असलेली ही रॅली काढली जाण्याची शक्यता असून, त्यानंतर सायंकाळी कणकवलीत राणे समर्थकांचा मेळावा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. राणे समर्थकांची ही एकजूट आणि स्वागत कार्यक्रमाकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!