दोडामार्ग–सावंतवाडीत रानटी हत्तींचा धुमाकूळ; शेतकरी भयभीत
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात रानटी हत्तींनी उपद्रव माजवला असून शेतकरी व ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे शेती, बागायतींचे प्रचंड नुकसान होत असून नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तातडीने बैठक लावण्याची मागणी केली आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कर्नाटक राज्याच्या धर्तीवर दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तीपकड मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार संबंधित वनविभाग अधिकाऱ्यांनी सखोल अभ्यास करून परिपूर्ण प्रस्ताव तयार केला असून तो मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्या मार्फत वनमंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावावर अंतिम निर्णय न झाल्याने हत्तींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच असून शेतकरी पूर्णतः वैतागले आहेत.
हत्तींकडून होणाऱ्या सततच्या नुकसानामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून आंदोलने व उपोषणांचा इशाराही दिला जात आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार दीपक केसरकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्राद्वारे तात्काळ निर्णय घेऊन हत्तीपकड मोहिमेस मंजुरी देण्याची तसेच आपल्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्याची ठाम मागणी केली आहे. या बैठकीस स्थानिक आमदार म्हणून स्वतःला आमंत्रित करण्याचीही त्यांनी विनंती केली आहे.






