

मालवणच्या नूतन नगराध्यक्षांनी स्विकारला पदभार
जल्लोषात करण्यात आले स्वागत
मालवण : प्रतिनिधी
“मालवणची जनता हेच माझे कुटुंब आहे. निवडणूक काळात मांडलेल्या विकासाच्या अजेंड्याला जनतेने पसंती दिली आहे. मालवणचा सर्वांगीण विकास, पर्यटनवाढ आणि स्थानिक प्रश्नांचे निराकरण हीच माझी प्राथमिकता राहील. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन लोकाभिमुख प्रशासन देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे,”असे प्रतिपादन मालवणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी केले.
मालवण नगरपालिकेच्या लोकनियुक्त पहिल्या महिला व सोळाव्या नगराध्यक्ष म्हणून शिंदे शिवसेनेच्या ममता मनमोहन वराडकर यांनी गुरूवारी (२५ डिसेंबर रोजी) नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या, “हा विजय माझा वैयक्तिक नसून मालवणच्या तमाम जनतेचा आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा विजय आहे. खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली. मालवणकरांनी मला भरभरून पाठिंबा देत विजयी केले.”
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शहर प्रमुख तथा नगरसेवक दीपक पाटकर, उमेश नेरुळकर, बाळू तारी, शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, भाग्यश्री मयेकर, मेघा गावकर, अश्विनी कांदळकर, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव, मोहन वराडकर, निकीत वराडकर यांच्यासह नगरसेवक व शिंदे शिवसेनेचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीनेही नगराध्यक्षांचे स्वागत करण्यात आले.
भाजपाचे नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, अन्वेशा आचरेकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर यांनीही नूतन नगराध्यक्षा ममता वराडकर यांची भेट घेत अभिनंदन केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर यांनीही सौ. वराडकर यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या.









