ठळक घडामोडी

वालावल सौभाग्यवती स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मधुरा प्रभूकेळुसकर ठरल्या ‘वालावल सौभाग्यवती 2026’च्या मानकरी

लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात रंगला सांस्कृतिक महासंग्राम

वालावल : प्रतिनिधी
      वालावल (ता.कुडाळ) येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात युवा संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘वालावल सौभाग्यवती 2026 (पर्व दुसरे)’ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी दाखविलेल्या उत्साहामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
     या स्पर्धेत मधुरा मधुसूदन प्रभूकेळुसकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘वालावल सौभाग्यवती’ हा मानाचा किताब पटकावला. त्यांना श्री देव लक्ष्मीनारायण यांची प्रतिमा आणि आकर्षक पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना मंडळाच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
     युवा संघर्ष मित्रमंडळ (वालावल) सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी ओळखले जाते. 20 मार्च रोजी झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, माजी सदस्य अतुल बंगे, सौ. रुद्रा पावसकर, अंगणवाडी सेविका आशा सावे, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती कुंडेकर तसेच देवस्थान कमिटीचे सदस्य गुरु देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
      एकूण सहा फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळाला. काही फेऱ्यांमध्ये स्पर्धकांच्या कौशल्य व बुद्धिमत्तेची कसोटी लागली, तर काही फेऱ्यांनी उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. वालावल गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. कार्यक्रमादरम्यान हळदी-कुंकू समारंभही पार पडला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष करुणाकर राऊळ यांच्यासह सागर पाटकर, पूजा राऊळ, भाग्यश्री राऊळ, हेमंत वालावलकर आणि विशाल राऊळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल करवडकर यांनी केले. गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!