

शिवजयंतीनिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांचा शब्द पूर्ण; वर्षभरात काम पूर्ण करण्याचा निर्धार

कणकवली : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत कणकवली शहरात आज भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणारे पारदर्शक व गतीमान प्रशासन देणे हे आमचे कर्तव्य आहे. कणकवलीकरांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. पुढील वर्षी याच दिवशी या भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, या भवनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या सांस्कृतिक चळवळीला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. कला, संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणारे हे भवन सर्वांसाठी खुले असेल. ही वास्तू अधिक दर्जेदार व्हावी यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच या वास्तूचा सांभाळ करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, ॲड. उमेश सावंत, एस. टी. सावंत, मनोज रावराणे, मुख्याधिकारी गौरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आश्वासन दिले की, शासनाच्या वतीने हे सांस्कृतिक भवन दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. पुढील वर्षभरात काम पूर्ण होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. यावेळी ‘अक्षरसिंधू कलामंच’तर्फे पालकमंत्र्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने भाई परब यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजयकुमार सर्वगोड यांनी केले.









