नवी मुंबई मेट्रो मध्ये साहिल शेटवे यांची चालकपदी नियुक्ती
मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळवली जबाबदारीची नोकरी
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी शेटवेवाडी येथील साहिल शरद शेटवे (वय २२) याची नवी मुंबई मेट्रोमध्ये (NMML-1) चालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याला मिळालेल्या या यशाबद्दल तिलारी परिसरासह संपूर्ण तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
साहिलचे आठवीपर्यंतचे शिक्षण साटेली-भेडशी येथील करुणा सदन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षण मुंबईत घेतले. मालवण येथील शासकिय तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातच त्याने मोठ्या यशाला गवसणी घातली. नवी मुंबईतील वाढत्या नागरी विस्तारामुळे मेट्रो सेवा ही दळणवळणाची महत्त्वाची कडी ठरत आहे. अशा या अत्याधुनिक आणि जबाबदारीच्या सेवेत साहिलची निवड होणे हे त्याच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फलित मानले जात आहे. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी इतक्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती मिळवून त्याने आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे.
साहिल हा शरद शेटवे यांचा सुपुत्र आहे. स्वर्गीय शरद शेटवे यांची ओळख कट्टर राणे समर्थक म्हणून होती. सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग घेणारे तसेच ठाम भूमिकेसाठी ओळखले जाणारे शरद शेटवे यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा प्रभाव साहिलच्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येतो.
शिंदे शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, शैलेश दळवी, स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचेn जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, विनायक शेटये यांनी साहिलचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी साहिल सोबत त्याचे चुलते शासकीय ठेकेदार ज्ञानेश्वर शेटवे उपस्थित होते.









