ठळक घडामोडी

स्वबळावर लढून देखील जनतेने ४९ हजार १३० मते देत ठाकरे शिवसेनेवर विश्वास दाखवला!

माजी आमदार वैभव नाईक यांची माहीती; विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे मानले आभार

जनतेच्या हक्कासाठी व जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी लढा सुरूच राहणार – वैभव नाईक

कुडाळ : प्रतिनिधी
           जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारला आहे.कुडाळ मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे २ जिल्हापरिषद सदस्य आणि ५ पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत.विजयी उमेदवारांचे  मी हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. आमचे अमरसेन सावंत,रमाकांत ताम्हाणेकर,संजना रेडकर,कृष्णा धुरी,समीर लब्दे हे आमचे उमेदवार अगदी थोडया मतांनी पराभूत झाले. कुडाळ मालवण तालुक्यात शिंदेगट आणि भाजप पक्षाची युती असूनही  शिंदे गटाच्या उमेदवारांना एकूण ५० हजार ३३५ मते आणि भाजपच्या उमेदवारांना ११ हजार ४५४ अशी एकूण ६१ हजार ७८९ मते शिंदे-भाजप महायुतीला मिळाली. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकटा लढून देखील आम्हाला ४९ हजार १३० मते मिळाली. आमच्यावर विश्वास दाखवलेल्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो असे कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
         वैभव नाईक पुढे म्हणाले, या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांनी पूर्ण ताकदीने काम केले.आज आमच्या पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांनी फोडले परंतु आमच्या पक्षाकडे कोणतीही ताकद नसताना आम्ही नवीन कार्यकर्ते तयार करून ही निवडणूक लढविली आणि या परिस्थितीतही ४९ हजार मते मिळविली.त्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
         कुडाळ मालवण सोडून इतर दोन्ही विधानसभा मतदारसंघात २५ पेक्षा जास्त जागा बिनविरोध झाल्या.त्यामुळे मतदारांचे मानसिक खच्चीकरण झाले. त्याचा फटका आम्हाला बसला.निवडणुकीच्या काळात मतदारांची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून विकास कामांची पत्रे, आश्वासने देण्यात आली. कुडाळ मालवण मतदारसंघातील उमेदवारांना देखील पैशांचे आमिषे देण्यात आले होते.आमच्या उमेदवारांच्या चौकशा लावून उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला. परंतु ते दबावाला बळी पडले नाहीत, स्वाभिमानाने निवडणूक लढले.आता केंद्रापासून जिल्हापरिषद पर्यंत महायुतीचे सत्ता आहे.त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी लोकांना जी आश्वासने दिलीत ती पूर्ण करा.त्यासाठी आमचे सहकार्य असेल.परंतु जे चुकीचे असेल त्याला आम्ही प्रखर विरोध करून विरोधी पक्षाची भूमिका बजावू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी, जनतेच्या हक्कासाठी आमची लढाई यापुढेही सुरू राहील असे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

error: Content is protected !!