ठळक घडामोडी

बसच बनली चोरीचं मैदान..१३ लाखांच्या सोन्यावर डल्ला; कुडाळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मुंबईतील आरोपीस अटक; एसटी प्रवासादरम्यान चोरीच्या गुन्ह्याची उकल

तांत्रिक तपासाने मिळाले यश; कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी

कुडाळ : प्रतिनिधी
    बस प्रवासादरम्यान चोरी झालेल्या १३ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची उकल करण्यात कुडाळ पोलिसांना यश आले असून, या प्रकरणात मुंबईतील आरोपीला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
     कुडाळ पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सौ. सुहासिनी रमाकांत पाटकर (वय ६४, रा. वायरी भूतनाथ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) या मालवण ते कुडाळ रेल्वे स्टेशन असा एसटी बसने प्रवास करत असताना अज्ञात इसमाने त्यांची सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरी करून नेली होती. या प्रकरणी पाटकर यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दिली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास कुडाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने सुरू केला. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक स्थापन केले होते. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेऊन संशयित मंगेश नाथुभाई नटू (वय ५५, रा. कोकरे आगार, सायन कोळीवाडा, अँटॉप हिल, मुंबई) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी श्री.हडळ यांनी ताब्यात घेत पुढील तपासासाठी कुडाळ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. कुडाळ पोलीसांकडून त्याला संशयिताला अटक करीत सखोल चौकशी केली असता, त्याने चोरी केलेले दागिने मुंबई येथे ठेवले असल्याची माहिती दिली. त्यानुसार कुडाळ पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबई येथे जाऊन सदर आरोपीने लपवून ठेवलेले सुमारे १३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ६,००० रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
     ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी (सावंतवाडी) विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सपोनि जयदीप पाटील, पो. फौजदार हडळ, पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर, हरेश पाटील, सुबोध मळगांवकर, सुप्रिया भागवत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, श्री.हडळ, अंमलदार राजेंद्र जामसंडेकर, सदानंद राणे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, किरण देसाई, जॅक्सन घोन्सालवीस, ज्ञानेश्वर तवटे, महेश समजीस्कर, धनश्री परब, युवराज भंडारी सहभागी होते. कुडाळ पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!