ठळक घडामोडी

परुळेत केबिनवर चढलेल्या महसूल कर्मचाऱ्यासह डंपर पळविला..!

डंपर कुडाळ हद्दितील; महसूल यंत्रणेत खळबळ

परुळे : प्रतिनिधी
        वेंगुर्ले तालुक्यातील परुळे परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे महसूल विभागात संतापाची लाट उसळली आहे. वाहन तपासणीदरम्यान थांबवलेला डंपर थेट महसूल कर्मचाऱ्यालाच सोबत घेऊन पळवण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
        मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ हद्दीतील एक डंपर वाळू भरून परुळे हद्दीतून मार्गस्थ होत होता,डंपर चालकास परुळे येथे वाहन तपासणीसाठी महसूल कर्मचाऱ्याने हात दाखवून गाडी थांबवण्याची सूचना केली. चालकाने डंपर रस्त्याकडेला उभा केला. यानंतर संबंधित महसूल कर्मचारी गाडीची पाहणी करण्यासाठी डंपरच्या केबिनवर चढला.मात्र, पाहणी सुरू असतानाच चालकाने अचानक डंपर वेगाने पुढे दामटला. केबिनवर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यासहच डंपर पळवून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही अंतरावर जाऊन डंपर थांबवण्यात आला; मात्र या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
     या प्रकाराची महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित चालकाविरोधात कठोर कारवाईची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. .दरम्यान, या घटनेमुळे वाहन तपासणीदरम्यान महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासन यापुढे अधिक दक्षता बाळगणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!