ठळक घडामोडी

दोडामार्ग – बांबर्डेत बाहुबली टस्कर हत्तीचा धुडगूस!

एका रात्रीत नारळ-सुपारी-केळी पिकांचा फडशा; शेतकरी हतबल

दोडामार्गात हत्तींचा वाढता वावर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

दोडामार्ग : प्रतिनिधी
    दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे येथे दाखल झालेल्या बाहुबली टस्कर हत्तीने काल गुरुवारी रात्री शेतकऱ्यांच्या फळबागायतीत घुसून प्रचंड नुकसान केल्याची घटना घडली. यात शेतकरी तुकाराम गावडे यांच्या नारळ, सुपारी व केळीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभी केलेली शेती एका रात्रीत जमीनदोस्त झाली आहे. आयुष्याची पुंजी असलेली शेती डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याने गावडे यांचे अश्रू अनावर झाले आहेत.
      वीजघर, बांबर्डे परिसरात गेल्या काही दिवसांपासून गणेश, ओंकार यांच्यासह सहा हत्तींचा कळप वावरत आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास या परिसरात बाहुबली टस्कर दाखल झाला. त्याच्या जोरदार घोरवण्याने संपूर्ण परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजामुळे लगतचे सहा हत्ती जंगलाच्या दिशेने पळाले, मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर बाहुबली टस्कराचा या परिसरातील वावर अधिक वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
    गुरुवारी रात्री बाहुबली टस्कराने थेट शेतकरी तुकाराम गावडे यांच्या फळबागायतीत प्रवेश करत अक्षरशः धुमाकूळ घातला. नारळ व सुपारीची झाडे मुळासकट उन्मळून टाकली, तर केळीच्या झाडांचा फडशा पाडला. आज सकाळी शेतात गेलेल्या गावडे यांच्या समोर अनेक वर्षांच्या कष्टाचे भयावह चित्र उभे राहिले. “हीच शेती माझ्या कुटुंबाची उपजीविका होती. आता आम्ही जगायचं कसं?” असा आक्रोश करत गावडे यांनी आपली व्यथा मांडली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हत्तींचा वाढता वावर आणि वारंवार होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!