ऑनलाईन बुकिंग अॅप्स बंदीची मागणी; जिल्हा प्रशासनाचे वेधले लक्ष
७ दिवसांत निर्णय न झाल्यास ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक ट्रॅव्हल व्यवसायावर वाढत्या डिजिटल स्पर्धेमुळे गंभीर संकट निर्माण झाले असून रेडबस ‘RedBus’ सारख्या ऑनलाईन बुकिंग अॅप्सविरोधात लक्झरी बस बुकिंग एजंट ऑपरेटर्स संघ, सिंधुदुर्ग आक्रमक झाला आहे. संघटनेच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देत या अॅप्सवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या निवेदनात स्थानिक छोट्या व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “ही केवळ स्पर्धा नसून स्थानिक रोजगारावर टाकलेला डिजिटल दरोडा आहे,” असा संतप्त सूर यावेळी उमटला. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक एजंट प्रवाशांना सेवा देत आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र ऑनलाईन अॅप्सनी मोठ्या प्रमाणात सवलती देत बाजारपेठ ताब्यात घेतली असून पारंपरिक व्यवसायिकांना बाहेर ढकलले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. स्थानिक एजंटांकडून मिळणारा पैसा जिल्ह्यातच फिरतो, मात्र ऑनलाईन कंपन्यांमुळे होणारी मोठी आर्थिक उलाढाल बाहेरच्या राज्यात वळवली जात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याची अर्थव्यवस्था कमकुवत होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद, नांदेड येथून येणाऱ्या लक्झरी बसमधून बेकायदेशीर मालवाहतूक केली जात असून ती सिंधुदुर्गमार्गे गोव्यात पाठवली जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. यावर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने ७ दिवसांत ठोस निर्णय घेतला नाही, तर जिल्ह्यातील सर्व ट्रॅव्हल एजंट कुटुंबासह रस्त्यावर उतरून तीव्र ‘चक्का जाम’ आंदोलन छेडतील, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष पाटणकर, उपाध्यक्ष उदय बांदेकर, खजिनदार अविनाश मर्तल, सचिव प्रितम धुरत, कार्याध्यक्ष उमेश बाणे, महेश मोडक, सुभाष मोरजकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक व्यवसाय व रोजगार वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.







