जि.प.-पं.स. निवडणुकीचा उद्या फैसला; उमेदवारांची धाकधूक वाढली!
२७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात; ६०.०८ टक्के मतदान; सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी!
मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त, तहसीलदार कार्यालयाजवळचा वेंगुर्ला–सावंतवाडी रस्ता उद्या बंद
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील जि.प.च्या ९ व पं.स.च्या १८ अशा एकूण २७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात असून या सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. उद्या सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून, उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कुडाळ तालुक्यात हि निवडणूक महायुती आणि ठाकरे शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागून राहिले आहे. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे सुरू होणार आहे. मतमोजणी दरम्यान तहसिलदार कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. तर मतमोजणी कालावधीत कुडाळ तहसीलदार कार्यालय नजिकचा वेंगुर्ला-सावंतवाडी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी कुडाळ तालुक्यात ६०.०८ टक्के एवढे सरासरी मतदान झाले. एकूण १ लाख १६ हजार ६३० मतदारांपैकी ७० हजार ०७७ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३६ हजार ९६८ पुरूष तर ३३ हजार १०९ महिला मतदारांनी मतदान केले. दरम्यान उद्या सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, सुरूवातीला टपाली मतमोजणी व त्यानंतर मतदान यंत्रातील मतमोजणी होणार आहे. सर्व गणांची एकाचवेळेस मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. १८ टेबलांवर निर्वाचित गणनिहाय ११ फे-यांमध्ये तालुक्याची मतमोजणी पूर्ण होईल. प्रत्येक टेबलावर १ झोनल अधिकारी व १ ग्राम महसूल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.
कुडाळ तहसिलदार कार्यालयात मतमोजणी केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राची रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी पाहणी केली. यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव व अन्य अधिकारी उपस्थित होते. दुपारी मतमोजणी संदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील, नायब तहसिलदार संजय गवस, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.
जि.प.गटनिहाय झालेले मतदान
आंब्रड – ६९८७ (५५.४२ टक्के)
वेताळबांबर्डे – ७६५२ (५९.१६ टक्के)
ओरोस बुद्रुक – ६३१२ (५२.५३ टक्के)
पावशी – ८१०२ (६४.८४ टक्के)
नेरूर देऊळवाडा – ७५९६ (६०.२८ टक्के)
तेंडोली – ७७८० (६०.७७ टक्के)
पिंगुळी – ८३१२ (५९.९० टक्के).
घावनळे – ८६५० (६३.०४ टक्के)
माणगांव – ८६९५ (६३.९७ टक्के)
मतमोजणीसाठी वेंगुर्ला-सावंतवाडी रस्ता बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उद्या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ येथे होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर होणारी संभाव्य गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, कुडाळ तहसील कार्यालय आवाराजवळून जाणारा वेंगुर्ला-सावंतवाडी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ६ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालय कुडाळच्या आवारानजिकहून जाणारा वेंगुर्ला-सावंतवाडी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी वेळी गर्दी टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून रस्ता बंद ठेवण्याचे व पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याबाबत आदेशीत केले आहे. मतमोजणीच्या कालावधीत वेंगुर्ला-सावंतवाडी मार्गावरील वाहनधारकांनी प्रशासनाकडून सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मतमोजणी पूर्ण होताच सदर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.









