मालवण : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मालवण संचलित डॉ. एस. एस. कुडाळकर प्राथमिक शाळा, मालवण यांच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची प्रशांत परब यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षांच्या यशस्वी, निष्ठावान व सेवाभावी कार्यासाठी “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सन्मान कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाग्यारेखा दळवी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत केलेली सातत्यपूर्ण वाढ, तसेच शिक्षक म्हणून दाखविलेली निष्ठा व नेतृत्वगुण याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. प्राची परब यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्य करताना अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले असून, शाळेच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली असून त्या अनेक शिक्षकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत.
या कार्यक्रमास व्यासपीठावर श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशनचे उपाध्यक्ष भालचंद्र राऊत, संस्थेचे सचिव महेश मांजरेकर, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष गणपत चौकेकर, उपाध्यक्षा सौ. गुळवे, सचिव श्री. नार्वेकर, तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सौ. प्राची प्रशांत परब यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमामुळे शिक्षकांमधील आपुलकी वाढण्यास व संघटनात्मक एकता अधिक दृढ होण्यास मदत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.






