ठळक घडामोडी

मुंबई मनपाच्या रणांगणात शिंदे सेनेचा ‘धडाकेबाज चेहरा’ निलेश राणे!

स्टार प्रचारक म्हणून मोठी जबाबदारी सोपविण्याची दाट शक्यता

कुडाळ : प्रतिनिधी
     मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) या निवडणुकीत आक्रमक रणनीती राबविण्याच्या तयारीत असून, कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यावर पक्षाकडून स्टार प्रचारक म्हणून मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
      आक्रमक वक्तृत्वशैली आणि थेट भूमिका यामुळे आमदार निलेश राणे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. अलीकडील नगरपरिषद निवडणुकांमध्ये त्यांनी घेतलेली ठाम भूमिका राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.  सिंधुदुर्गातील मालवण नगरपरिषदेत विजय मिळवत त्यांनी आपली राजकीय ताकद अधोरेखित केली. कणकवलीत स्वतंत्र भूमिका घेत शहर विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नगराध्यक्षपदाचा विजय निश्चित केला. या सर्व घडामोडींमुळे शिंदे शिवसेनेच्या नेतृत्वाने आमदार निलेश राणे यांना मुंबई मनपाच्या रणांगणात आक्रमक प्रचाराची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ठाकरे सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईतच निलेश राणेंवर ही जबाबदारी येणार असल्याने आगामी निवडणुकीत राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. थोडक्यात, मुंबई मनपाच्या निवडणुकीत शिंदे सेनेचा ‘आक्रमक चेहरा’ म्हणून निलेश राणे चर्चेत आहेत.

error: Content is protected !!