वालावल हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
आदर्श विद्यार्थी म्हणून अथर्व ठाकूरचा गौरव
कुडाळ : प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून, पालकांनी आपल्या पाल्याच्या संगतीकडे व मित्रपरिवाराकडे विशेष लक्ष द्यावे. सायबर सुरक्षेबाबत सर्वांनीच जागृत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले.
ते नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय, वालावल (ता. कुडाळ) येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाचे अध्यक्ष जी. एम. उर्फ आप्पा सामंत होते. यावेळी व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी तथा पणदूर विद्यालयाचे शिक्षक अविनाश वालावलकर, मुख्याध्यापक नारायण कोठावळे आदी उपस्थित होते.
आदर्श विद्यार्थी म्हणून अथर्व विलास मठकर, दहावीत प्रथम आलेली लक्ष्मी विनायक चव्हाण यांचा विशेष स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी प्रीतम वालावलकर यांची खेलो इंडिया सामनाधिकारी म्हणून झालेली निवड तसेच किशोर पाताडे यांची राष्ट्रीय कबड्डी पंच म्हणून झालेली निवड व राज्य हौशी नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झालेली समीक्षा फडके यांचा शाल श्रीफळ व राष्ट्रीय हरित सेने मार्फत फुलांची कुंडी देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन विशाल कदम व संतोष गोसावी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रियंका मयेकर, मंगेश कोचरेकर, मानसी कोचरेकर, दर्शन खडपे, रमेश गोवेकर, तसेच आजी-माजी विद्यार्थी पालक आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.










