ठळक घडामोडी

१२ जुलै रोजी ‘कुडाळ मान्सून रन २०२६’; रजिस्ट्रेशन लिंकचे उत्साहात अनावरण

सिंधुदुर्गातील पहिले लोहपुरुष प्रमोद भोगटे यांचा विशेष सन्मान

५ ते २१ किमी गटांत हाप मॅरेथॉन स्पर्धा; सिंधुदुर्गासह महाराष्ट्र, बेळगांव, गोवा येथील धावपटू होणार सहभागी

कुडाळ : प्रतिनिधी
       राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ तसेच टीम कुडाळ मान्सून रन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी १२ जुलै २०२६ रोजी ‘कुडाळ मान्सून रन २०२६’ या भव्य हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेच्या रजिस्ट्रेशन लिंकचे अनावरण येथील मराठा समाज हॉलच्या सभागृहात आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले लोहपुरुष प्रमोद भोगटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
      ‘Every running step makes your heart stronger’ ही यंदाच्या मॅरेथॉनची टॅगलाईन असून ५, १०, १६ आणि २१ किलोमीटर अशा विविध गटांत ही स्पर्धा होणार आहे. सिंधुदुर्गसह मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी आदी ठिकाणांहून धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. यावेळी डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, गजानन कांदळगावकर, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. प्रशांत मडव, डॉ. जयसिंग रावराणे, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर, रूपेश तेली, डाॅ. मिलिंद बोर्डवेकर, डाॅ.गिरीश बोर्डवेकर, डाॅ.सोमनाथ परब, डाॅ.सई राणे, डाॅ.अनघा बोर्डवेकर, डाॅ.शुभांगी जोशी, सुजाता रासकर, सोनाली पालव आदींसह कुडाळ मान्सून रनची टीम उपस्थित होती. यावेळी सिंधुदुर्गातील पहिले आयर्नमॅन प्रमोद भोगटे यांचा टिम कुडाळ मान्सून रनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
       दरवर्षीप्रमाणे ही भव्य मॅरेथॉन कुडाळ एमआयडीसी मधील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या परिसरातून सुरू होणार आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर गेल्या चार वर्षांपासून रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार रूग्ण सेवा देत आहे. अनेक अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या सुविधांसाठी आतापर्यंत रुग्णांना अन्य जिल्ह्यात किंवा राज्यात उपचारासाठी जावे लागत होते, अशा सुविधा या हाॅस्पिटल मार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सुविधा सुरू करण्यात आल्या असून अनेक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे. ही सेवा कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर रुग्णांसाठी एक जीवनदायी योजना ठरत आहे. तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात. जसे की रक्तदान शिबिर, श्रवणदोष चिकित्सा शिबीर, दंतचिकित्सा शिबिर, फिजिओथेरपी शिबिर, आंतरराष्ट्रीय योगदिन उपक्रम आदी विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ‘Healthy Nation’ या संकल्पनेतून नागरिकांनी निरोगी व आनंदी जीवन जगावे, या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी टीम कुडाळ मान्सून रनचे डाॅ.जी.टी.राणे व सहका-यांनी सांगितले.
     आतापर्यंत या मॅरेथॉन मध्ये सिंधुदुर्गासह जिल्ह्याबाहेरील ब-याच स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षी सुमारे १,३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यंदा त्याहून अधिक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. स्पर्धेचे यंदाचे ३ रे वर्ष आहे.  स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम दोन विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट देण्यात येणार आहे. ही मॅरेथॉन कुडाळ एमआयडीसी येथून सुरू होऊन नेरूर मार्गे वालावल मंदिर परिसरातून पुन्हा एमआयडीसी येथे येणार आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात धावण्याचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन टीम कुडाळ मान्सून रनच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9421261212 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.ranehospital.net या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!