महायुतीचा कुडाळ पंचायत समितीवर झेंडा फडकला
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत महायुतीचा झेंडा फडकला.
सभापतीपदी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची बिनविरोध निवड झाली. ठाकरे शिवसेनेने या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुतीकडून दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आणि निवडणूक ही फक्त औपचारिकता ठरली.
कुडाळ पंचायत समितीत महायुतीचे वर्चस्व आहे. १८ सदस्यांपैकी भाजपाचे ७, शिंदे शिवसेनेचे ६ आणि ठाकरे शिवसेनेचे ५ सदस्य असून, सभापतीपदासाठी भाजपापेक्षा एक सदस्य कमी असूनही महायुतीच्या फाॅर्म्युल्यानुसार शिंदे शिवसेनेला सभापतिपद मिळाले. यामुळे कुडाळ तालुक्यात आ. निलेश राणे यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले.
सभापती व उपसभापती निवडीसाठी सोमवारी निवडणूक कार्यक्रम पार पडला. सकाळी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. यावेळी अधिकृतरित्या अर्ज दाखल करताना शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, जि.प. सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, रूपेश कानडे, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, बाळकृष्ण मडव, निखिल कांदळगावकर आणि महायुतीचे सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम देखील उपस्थित होते.
कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात सायंकाळी तीन वाजता निवडणूक निर्णय अमरसिंह जाधव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल वालावलकर उपस्थित होते. दुपारी तीन वाजल्यापासून नामनिर्देशन पत्रांची छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आणि निवडणूक यावेळी पार पडली; परंतु दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज असल्याने बिनविरोध निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अमरसिंह जाधव यांनी सभापतीपदी मिलिंद नाईक आणि उपसभापतीपदी सिताराम तेली यांची नावे अधिकृतरित्या जाहीर केली. यानंतर महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार यांच्यासह नागरिकांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.









