राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाहीत; राणे एकसंधच राहतील – कणकवलीत गर्जना

कणकवली : प्रतिनिधी
जे राणेंना संपवायचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मी पुरून उरलो आहे. माझ्या रामेश्वराचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत मला कोणीही संपवू शकत नाही, असा स्पष्ट आणि ठाम इशारा खासदार नारायण राणे यांनी कणकवलीतील सभेत बोलताना दिला. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन करताना राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाहीत. कुणी कितीही प्रयत्न केला तरी राणे एकसंधच राहतील, असा ठणकावून संदेश त्यांनी विरोधकांना दिला.
खासदार नारायण राणे आज सिंधुदुर्गात दाखल होताच राणे समर्थकांनी जिल्ह्याच्या सीमेवर त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर बांदा ते कणकवली अशी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे रूपांतर सायंकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर झालेल्या जाहीर सभेत झाले. या सभेत बोलताना खा.राणे यांनी पैशांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. पैशाने विकले जाऊ नका. फितुरी करून गेलेल्यांचे कधीच भले झालेले नाही. द्वेषाच्या राजकारणाला थारा देऊ नका, असा स्पष्ट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
खा.राणे पुढे म्हणाले, माझे वय कितीही झाले तरी मी मागे पाहणारा नाही. जगेन तर स्वाभिमानानेच जगेन. मला पदांची अपेक्षा नाही. ३५ वर्षांत अनेक पदे भूषवली, पण एका पदाचाही गैरवापर केला का, हे एकाने तरी सांगावे, असे आव्हानात्मक वक्तव्य राणे यांनी केले. भाजपा हा माझा शेवटचा पक्ष असून तो अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकसंधपणे काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे हे दोघेही चांगले काम करत असून त्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन करताना राणे म्हणाले, “पदे येतात-जातात, पण जनता महत्त्वाची आहे. पद असो वा नसो, जिवंत असेपर्यंत कोकणातील जनतेची सेवा करणारच. ३१ मार्च २०२६ पर्यंत जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आजच्या रॅलीसाठी कोणालाही पैसे देऊन आणले नाही. हा मेळावा कार्यकर्त्यांच्या प्रेमातून झाला आहे. भांडणे, लावलावी नको. पक्ष वाढवायचा असेल तर प्रामाणिकपणे काम करा, असे सांगत राणे यांनी कार्यकर्त्यांना शिस्तीचा इशाराही दिला. या सभेला सौ. निलम राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप आणि शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले.










