पावशी जि. प. मतदारसंघातून निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा करत विजयाचा निर्धार व्यक्त केला.
आज सकाळी पणदूर येथील श्री गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून दर्शन घेतल्यानंतर दादा साईल यांनी आंबडपाल येथील श्री देवी भद्रकाली मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गणराय आणि आई भद्रकालीचा आशीर्वाद पाठीशी असल्याने विजय निश्चित आहे,” अशी भावना साईल यांनी व्यक्त केली.
प्रचाराचा नारळ वाढवल्यानंतर माध्यमांशी बोलताना दादा साईल यांनी विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला. ते म्हणाले, “मागील पाच वर्षांत या प्रभागात ठोस विकास झाला नाही. जनतेमध्ये बदलाची तीव्र इच्छा आहे. मला संधी दिल्यास पावशी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून हा प्रभाग राज्यात ‘नंबर वन’ बनवण्याचा माझा संकल्प आहे.” महायुतीतील सर्व घटक पक्षांचे भक्कम पाठबळ आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला असून दादा साईल यांनी मतदारांशी थेट गाठीभेटी सुरू केल्या आहेत.









