ठळक घडामोडी

मालवण नगरपालिकेत प्रशासकीय काळात लाखोंचा भ्रष्टाचार – महेंद्र म्हाडगुत यांचा आरोप

कचरा व्यवस्थापनात खर्च लाखोंचा, खत निर्मिती मात्र शून्य

चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणारम्हाडगुत

मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)
      मालवण नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात कचरा व्यवस्थापन आणि विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे शिवसेनेचे नगरपालिकेचे गटनेते महेंद्र म्हाडगुत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत पुरावे देखील माध्यमांसमोर सादर करत असल्याचे सांगत नगरसेवक नसले की प्रशासन मनमानी कारभार करते, हेच यातून सिद्ध होत असून आम्ही जनतेच्या पैशांचा हा अपहार खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली जाणार आहे. जोपर्यंत संबंधित दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत ठाकरे शिवसेना पाठपुरावा सोडणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
      ठाकरे शिवसेना कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर, अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, ॲड. सुमित जाधव, तेजस नेवगी, दत्ता पोईपकर, सुरेश मडये आदी पदाधिकारी उपस्थित होते.
         श्री.म्हाडगुत म्हणाले, शहरात कचरा विलगीकरण आणि खत निर्मितीसाठी लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात खत निर्मिती शून्य आहे. म्हाडगुत यांनी पुढे सांगितले की, आम्ही प्रत्यक्ष डम्पिंग यार्डची पाहणी केली असता तिथे यंत्रसामग्री बंद अवस्थेत आढळली. कागदावर १६ कामगार दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात केवळ ५-६ कामगार कार्यरत होते. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कामगारांची हजेरी पालिकेत लावली जाते तेच कामगार शहरातील खासगी मॉल्स आणि दुकानांमध्ये कामाला आहेत. कामगारांच्या नावावर पैसे उचलून ते पुन्हा त्यांच्याकडून काढून घेतले जात असल्याचा संशय आहे. २०२२-२३ या ६ महिन्यांत १४ लाख ५८ हजार खर्च दाखविण्यात आला तर खत निर्मिती शून्य. २०२४ या वर्षात ५७ लाख ५६ हजारांचे टेंडर काढण्यात आले. त्यातील ३५ लाख अदा केले तर खत निर्मिती शून्य. एवढा मोठा खर्च होऊनही कचऱ्याचे ढीग तसेच असून ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ का दिली जाते? असा प्रश्न ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
     आडवण दलित वस्तीतील पाणीपुरवठा आणि पंप बसवण्याच्या कामातही मोठा गैरप्रकार समोर आला आहे. ज्या कामासाठी १ लाख ४७ हजारांची निविदा काढण्यात आली, ते काम प्रत्यक्षात ४० ते ५० हजारांचे आहे. वायरचे अंदाजपत्रक बघितले तर ते अवास्तव होते. आम्ही पाहणी केली तेव्हा पंप आणि पॅनल आधीच बसवलेले होते आणि पाणीपुरवठा सुरू होता. जर काम आधीच झाले होते, तर निविदा कोणासाठी काढली? हा प्रकार म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाललेला भ्रष्टाचाराचा कळस आहे, असे म्हाडगुत म्हणाले.
     नगरसेवक कशाला हवेत? असे विचारणाऱ्यांना हे उत्तर आहे. प्रशासकीय काळात जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्याला आळा घालण्यासाठी आणि जनतेच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी नगरसेवकच हवेत. आम्ही सध्या विरोधी पक्षात असलो तरी सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासनावर अंकुश ठेवून मालवणच्या जनतेला दर्जेदार सेवा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!