५० कलाकारांच्या सहभागातून किल्ले पन्हाळगडावरून सुटकेचा प्रसंग जिवंत
युवा व बालकलाकारांच्या अभिनयाने रंगला शिवजयंती उत्सव
कुडाळ : प्रतिनिधी
बिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासातील किल्ले पन्हाळगडावरून सुटकेच्या प्रसंगावर आधारित ‘शिवरायांची शौर्यगाथा’ या महानाट्याच्या अंगाने सादर केलेले नाट्यप्रयोग रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. लहानथोर अशा तब्बल ५० कलाकारांच्या सहभागातून सादर झालेल्या या नाटकाला बिबवणे तसेच पंचक्रोशीतील रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी आणि बिबवणे–पिंगुळी शिवप्रेमी यांच्या वतीने शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेसह ‘शिवरायांची शौर्यगाथा’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ आकाशवाणी प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार तथा रंगकर्मी निलेश उर्फ बंड्या जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जि.प. सदस्या आरती पाटील, पं.स. सदस्य मंगेश प्रभू, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमाकांत चव्हाण व निखिल ओरोसकर, सरपंच सृष्टी कुडपकर, प्राथमिक शिक्षक अमोल गोसावी, नाट्य दिग्दर्शक नागेश नाईक, भजनी बुवा दत्ता पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर लुडबे आदी मान्यवर उपस्थित होते.
या नाटकाचे दिग्दर्शन अंकुश कुंभार आणि नागेश नाईक यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन सुरज शिंदे यांनी केले. प्रकाशयोजना निलेश परब, अमोल गोसावी आणि गोट्या सावंत यांनी केली. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनेक वर्षांनंतर युवा कलाकारांनी स्वतः पुढाकार घेत ऐतिहासिक नाट्यप्रयोग उभा केल्याने बिबवणे पंचक्रोशीत या प्रयोगाबद्दल विशेष उत्सुकता होती. दोन मजली किल्ल्याचा भव्य सेट हे या नाटकाचे विशेष आकर्षण ठरले. नृत्य, गाणी आणि रेकॉर्डेड संवाद यांच्या संगमातून कलाकारांनी शिवकालीन वातावरण रंगमंचावर साकारले.
या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका महेश अडसुळे, शिवा काशीद – केतन धुरी, बाजीप्रभू – अमोल कुडपकर, तर बहिर्जी नाईक – नीलकमल पवार यांनी प्रभावीपणे साकारली. बाल शिवाजी व शंभूराजे – दीप सावंत, जिजाऊ- वेदा कुडपकर, अफजलखान – मयुरेश लाड, बडी बेगम – कोमल नाईक, शाहिर – सचिन नाईक, कलावंतीण नेत्रा पवार, सिद्दी जोहर – शशांक नाईक, मुगल हेर- बंड्या नाईक, सय्यद बंडा व इंग्रज पप्पू वेंगुर्लेकर, गागा भट्ट – प्रसाद नाईक, रायबा – विनु आळवे, मावळा- पपू अडसुळे, यशवंत (आनंद) बिबवणेकर, वेद लोके, ओंकार वेंगुर्लेकर, अनिरुद्ध तुळसकर, मयुरेश नाईक, कडक लक्ष्मी व मावळा – भूषण सावंत, मुगल- सोमनाथ वेंगुर्लेकर, मुगल सैनिक अभी कुडपकर, सिद्धी मसूद- यश सावंत, जीवा महाला – मंगेश सावंत, रयतेची मुले काव्या कुडपकर, आरोही बिबवणेकर, निलांशी नाईक, रयत स्त्री – वेदिका चव्हाण, उर्वी आळवे, विधी राऊळ, साक्षी वारंग, जिया राऊळ, स्वरा चव्हाण, विधी राऊळ, साधना पाटील, रुद्रा नाईक, राशी नाईक, सानिका पाडलेकर, भवानी माता व रयत स्त्री- हर्षदा चव्हाण, लाकूड तोड्या – पार्थ लोट, गावकरी रयत- स्वनिक ओरोसकर, औक्षण करणारी स्त्री सृष्टी कुडपकर यांसह लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुमारे ५० कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या. या नाट्यप्रयोगातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा, त्यागाची शिकवण आणि पराक्रमाचा इतिहास प्रभावीपणे उभा राहिला. उपस्थित मान्यवरांनी नाटकाचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. तसेच या नाटकाचे प्रयोग सिंधुदुर्गात विविध ठिकाणी व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील प्रयोग बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत कुडाळ येथे होणार असल्याची घोषणा चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केली.
नाट्यप्रयोग यशस्वी होण्यासाठी शिवप्रेमींनी विशेष परिश्रम घेतले असून ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.









